परळ रेल्वे स्थानकात रॅम्प नसल्याने रुग्णांची परवड

परळ रेल्वे स्थानकात रॅम्प नसल्याने रुग्णांची परवड

केईएम, टाटा मेमोरियल, वाडिया ही मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये परळ परिसरात आहेत. साहजिकच परळ रेल्वे स्थानकातून या रुग्णालयांत ये-जा करणा-या रुग्णांची संख्याही मोठी आहे, मात्र परळ स्थानकात रुग्णांना चढ-उतार करण्याकरता एकही रॅम्प नसल्याने रुग्णांची परवड होत आहे.

आधीच परळ स्थानकातील अग्निदिव्यातून सामान्य रेल्वे प्रवासी होरपळून निघत आहेत. अरुंद पुलामुळे या स्थानकातून बाहेर निघण्यास किमान अर्धा तासाचा अवधी लागतो. त्यात स्थानकात रॅम्प नसल्याने रुग्णांनादेखील इतर प्रवाशांसाठी असलेल्या पादचारी पुलाचा वापर करावा लागतो. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला असलेली दाट लोकवस्ती आणि नव्याने उभे राहिलेले व्यावसायिक आणि गृहप्रकल्पांमुळे या परिसरातील गर्दीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

परिणामी या स्थानकातील पादचारी पुलावर अनेकदा कोंडी होते. गर्दीच्या वेळी एखादा रुग्ण या पुलावरून चढ-उतार करत असल्यास त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांना या पुलाने उतरण्याकरता वेळ लागत असल्याने त्यांच्यामागे प्रवाशांच्या भल्या मोठया रांगा लागलेल्या असतात.

मागील काही वर्षापासून ही परिस्थती कायम असतानाही रेल्वे प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करतात. स्थानकातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता दादर दिशेने रेल्वेकडून नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे, मात्र योग्य नियोजनाअभावी या पुलाचा उपयोग प्रवाशांना करता येत नाही. त्यामुळे एका पादचारी पुलावर प्रचंड गर्दी; तर दुस-या पुलावर शुकशुकाट असल्याचे चित्र दिसते.

दरम्यान, पुलावरील गर्दीमुळे अनेक  प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्यात धन्यता मानतात. त्यामुळेच या स्थानकातील अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. याशिवाय स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन अपघात घडण्याची शक्यताही वर्तवण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *