या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म. या क्षेत्रात घरातील कोणीच नसल्याने शिक्षण घेतानाच एका वास्तुविशारदाकडे नोकरी करीत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संघर्ष करीत या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिक कामाला कष्टाची जोड दिल्याने व मिळालेल्या अनुभवातून अनेक कामे मिळाल्याने समाधान वाटते. या क्षेत्राव्यतिरिक्त मॅरेथॉन, टेनिस व बाईक चालविण्याची आवड आहे. सांगताहेत, वास्तुविशारद विलास सानप.
आई-वडील शेतकरी असलेल्या कुटुंबात जन्म झाल्यावर गावालगतच प्राथमिक शिक्षण घेतले. मात्र, लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास होता. त्यामुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर पुण्याच्या बी.के.पी.एस. या नामांकित आर्किटेक्ट महाविद्यालयातून पदवी घेतली. या क्षेत्रात कोणीच नसल्याने गावात व घरात खूप कौतुक झाले. शिक्षण घेतानाच या क्षेत्रात जवळचे कोणीच नसल्याने याच क्षेत्रातील अधिकाधिक ज्ञान मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवत आर्किटेक्ट ऑफिसमध्ये अंशवेळ नोकरी करीत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी येथील बंगल्याचे पहिले काम मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र, कल्पकता, जिद्द व मेहनतीच्या जोरावर स्टीलचा उत्तम वापर करीत हे आरसीसी बांधकाम पूर्ण केले. हे काम पाहण्यासाठी माझे विद्यार्थी मित्रही यायचे. त्यांच्यासह मालकाने या कामाचे खूप कौतुक केल्याने खूप आनंद झाला.
त्यानंतर नाशिक परिसरातही अनेक कामे उभी केली. आज मागे वळून पाहताना खूप समाधान वाटते. आज व्यवसायाबरोबरच टेनिस खेळणे, मॅरथॉनमध्ये सहभाग व मनसोक्त बाईक राईडिंग हे छंद जोपासतो. मुंबई व हैदराबाद येथील मॅरेथॉन विक्रमी वेळेत पूर्ण केल्याने राज्यपातळीवर चमकण्याचे मोठे समाधान व आनंद आहे. सध्या रहिवासी बंगल्यांसह इमारती, वाणिज्य कार्यालये तसेच इंटेरियरची मोठी कामे सुरू आहेत. आता या क्षेत्रात येऊन काम करण्याचे मोठे समाधान व आनंद वाटतो.