वर्धा – दारुगोळा भांडार आगीत दोन अधिका-यांसह, १७ जणांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प)सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिका-यांसह सतरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  एक लेफ्टनंट कर्नलसह एका कर्नलचा समावेश आहे. आग लागल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील गावांना जबर हादरे बसले.

आग ऐवढी भीषण आहे की कॅम्प परिसरालगतच्या १५ कि.मी. परिघातील गावांतील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत आहेत. कॅम्प परिसरालगतच्या नागझरी भागाला आग लागली असून इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे १५ गावांतील नागरिक देवळीच्या दिशेने जीव वाचवित पळू लागले. याबाबतची माहिती तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना देण्यात आली असून देवळी येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे.
शिवाय डेपो परिसरातील गावे खाली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. डेपो परिसरालगतच्या झाडाझुडपांना सोमवारी अचानक आग लागली ही बाब वेळीच कुणाच्याही लक्षात न आल्याने आगीने भीषण रुप धारण केले. हीच आग डेपो परिसरात पसरल्याने घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने  सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *