पॅरिसहून कैरोला जाणारे इजिप्त एअरलाईन्सचे विमान गेल्या गुरुवारी अचानक रडावरून गायब झाले होते. त्याचा कसून शोध घेतल्यानंतर ते विमान भूमध्य सागरात कोसळल्याचे आढळले.
या वेळी समुद्रात सापडलेल्या मानवी अवशेषावरून विमानात स्फोट झाल्याचा दावा इजिप्तच्या न्यायवैद्यक विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे.
कैरो येथील शवगारात अपघातातील मृतदेह ठेवण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातून हे विमान स्फोटामुळेच कोसळल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी सापडलेले ८० अवशेष कैरोत आणले असून त्यात शरीराचा एकही पूर्ण भाग नाही.
अवयवांच्या चिंधडय़ा झालेले आहेत. यावरून या विमानात स्फोट झाल्याचे निदर्शनास येते. ग्रीसच्या संरक्षण मंत्र्यांच्या मते विमानात बॉम्बस्फोट झाल्याचा अंदाज आहे. मात्र याचे कुठलेही पुरावे नाहीत.
या अपघातात विमानातील सर्व ६६ प्रवासी व कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. मृत प्रवाशांच्या नातेवाईक कैरो येथील शवागारात ओळख पटवण्यासाठी आले असता त्यांनी डीएनए नमुन्यांची मागणी केली आहे. तर ब्रिटन, सायप्रस, फ्रान्स, ग्रीस व अमेरिका या देशांची जहाजे व विमाने अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत.