पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुस्लिम शेतक-याने केला जमीनीचा त्याग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला सत्तेवर येऊन येत्या २६ मे रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याच दिवशी उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे मोदींची एक सभा आयोजित करण्यात आली असून त्या सभेसाठी एका मुस्लिम शेतक-याने आपली ८ एकर जमीन मोफत (वापरासाठी) दिली आहे. विशेष म्हणजे सभेसाठी ही जागा वापरता यावी म्हणून त्याने मोठ्या कष्टाने लावलेले उसाचे पीकही कापून टाकले आहे आणि त्यासाठी कोणतीही भरपाई व मोबदला घेण्यासही त्याने नकार दिला आहे.
सहारणपूरमधील दिल्ली रोड येथे मोदींची सभा आयोजित करण्यात आली असून त्यासाठी २६५ एकर जमीनीवर स्टेज व मंडप घालण्यात येणार आहे. त्यामधील काही जमीन ही रईस अहमद या मुस्लिम शेतक-याची असून त्यावर त्यांनी ऊसाची पेरणी केली होती. मात्र पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी त्यांनी स्वखुशीने आपली जमीन दिली असून त्याकरिता ऊसाचे पीकही काढून टाकले आहे.
सहारणपूरमधील नेते राजीव गुम्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमिनीसाठी रईस अहमद यांना मोबदला म्हणून काही रक्कम देण्यात येणार होती, मात्र त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला.
‘ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करतो, त्याच परंपरेनुसार मी हे (जमीन देण्याचे) पाऊल उचलले आहे’, असे अहमद यांनी सांगितले. ‘सर्व गावकरी या सभेसाठी काही ना काही मदत करत असताना मी तरी कसा मागे राहू?’ असा प्रश्नही अहमद यांनी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *