राजधानी दिल्लीतील लाजपत नगरमधील एका हॉटेलमध्ये बिल भरण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर अज्ञात इसमांनी हॉटेल मालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. वासुदेव उर्फ पप्पू (वय ६०) असे त्या हॉटेल मालकाचे नाव असून त्याच्या शरीरात दोन गोळ्या घुसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लाजपत नगर ३ येथे वासुदेव यांच्या मालकीचा सिंधी ढाबा असून सोमवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास उत्तर प्रदेशचा रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या मारूती सिफ्ट कारमधून ३ व्यक्ती तेथे जेवण्यास आले. मात्र जेवण झाल्यावर ते बिल ने देताच निघून जाऊ लागले असता, वासुदेव यांनी त्यांना रोखून पैसे मागितले असता त्यांच्यात वादावादी झाली. त्याचदरम्यान त्या तिघांपैकी एका इसमाने वासुदेव यांच्यावर बंदूक रोखून चार गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. वासुदेव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
