आयपीएलच्या नवव्या मोसमातील महत्त्वपूर्ण लढतीत शनिवारी (२१ मे) गतविजेता मुंबई इंडियन्ससमोर गुजरात लायन्सचे आव्हान आहे. साखळीतील शेवटचा सामना असल्याने अंतिम चार संघात (प्ले ऑफ फेरी) स्थान मिळवण्यादृष्टीने रोहित शर्मा आणि सहका-यांना विजय आवश्यक आहे.
१३ सामन्यांतून ७ विजयांसह (१४ गुण) मुंबई पाचव्या स्थानी आहे. माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्सवर सहा विकेटनी विजय मिळवत गुजरातने (१३ सामन्यांत १६ गुण) पाचव्या स्थानावरून थेट दुस-या स्थानी झेप घेतली. चांगली सरासरी पाहता लायन्सचे बाद फेरीतील आव्हान कायम आहे. त्यामुळे सुरेश रैना आणि कंपनी थोडी ‘रिलॅक्स’ झाली आहे. मात्र मुंबईची अडचण वाढली आहे. मुंबईला अव्वल चार संघात स्थान मिळवण्यासाठी विजयासह चांगल्या सरासरीसह जिंकणे आवश्यक आहे.
मागील हंगामाप्रमाणे मुंबईने खराब सुरुवातीतून स्वत:ला सावरले. ‘पॅचेस’मध्ये का होईना, सांघिक कामगिरी उंचावत त्यांनी बाद फेरी गाठण्यादृष्टीने दावेदारी पेश केली आहे.मात्र ‘प्ले ऑफ’ फेरीचे आव्हान कायम ठेवण्यादृष्टीने गतविजेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आठवडाभराने लढत होत असल्याने मुंबईचे क्रिकेटपटू थोडे सुस्तावले असतील. मात्र आळस झटकून त्यांना खेळावे लागेल. कर्णधार रोहित शर्मासह अंबाती रायुडूवर मुंबईची फलंदाजीची मदार आहे. या दुकलीला अष्टपैलू कृणाल पंडय़ा, कीरॉन पोलार्डची चांगली साथ लाभली आहे. गतविजेत्यांची गोलंदाजीही प्रभावी आहे. मिचेल मॅकक्लेनॅघन आणि जसप्रीत बुमरा या मध्यमगती जोडीने चांगले सातत्य राखले आहे. कृणाल आणि पोलार्डही ब-यापैकी गोलंदाजी करत आहे. अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगला थोडा फार सूर गवसला आहे.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्सनी आयपीएल पदार्पण झोकात केले. मात्र त्यानंतर त्यांच्या कामगिरीला थोडी दृष्ट लागली. परंतु, गुजरातनेही ‘प्ले ऑफ’च्या आशा उंचावल्यात. सध्या अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादसह त्यांचे समान म्हणजे प्रत्येकी १६ गुण आहे. बंगळूरु रॉयल चॅलेंजर्ससह मुंबई इंडियन्स तसेच कोलकाता नाईट रायडर्सचेही प्रत्येकी १४ गुण आहेत. या तिन्ही संघांचे समान १६ गुण झाले तर ‘रनरेट’ महत्त्वपूर्ण ठरेल. कोलकात्याविरुद्धच्या सहज विजयाने गुजरातचा आत्मविश् वास उंचावला आहे. त्याचा फायदा त्यांना मुंबईविरुद्ध होईल. सध्याची कामगिरी पाहता लायन्सना पदार्पणात ‘प्ले ऑफ’ फेरी गाठण्याची संधी आहे. मात्र गुजरातने गाफील राहू नये. तसेच प्रतिस्पध्र्याला कमी लेखू नये. मुंबईने दोन आयपीएलवर नाव कोरले आहे. महत्त्वपूर्ण लढतीत खेळ कसा उंचवावा, हे रोहित शर्मा आणि सहका-यांना ठाऊक आहे.
‘करा किंवा मरा’ लढत असल्याने मुंबईची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरातला पदार्पणात ‘प्ले ऑफ’ फेरी गाठण्याची ओढ लागली आहे. उभय संघ तुल्यबळ असल्याने चुरशीची लढत अपेक्षित आहेत.