कुडाळ नगराध्यक्ष पदासाठी विनायक राणे यांना उमेदवारी

कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळतो, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागून राहिले असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदाची माळ माजी उपसरपंच आणि काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष विनायक राणे यांच्या गळयात घातली.

विनायक राणे यांनी शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी प्रशासक अजय घोळवे यांच्याजवळ उमेदवारी अर्ज दाखल केला. १२ मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला ९, शिवसेनेला ६, भाजपा १ आणि अपक्ष १ असे बलाबल आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या १२ मे रोजी होणा-या निवडीसाठी काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागून राहिले होते.

नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या आरक्षणात इच्छुक असले तरी काँग्रेस नेते नारायण राणे जो उमेदवार देतील, तो आम्हाला मान्य असल्याची भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी घेतली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या निर्णयाचा बंद लखोटा प्रथेप्रमाणे घेऊन येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयात जमले होते.

सकाळी अकराच्या सुमारास सामंत उमेदवारीचा बंद लखोटा घेऊन आले आणि नारायण राणे यांनी पाठवलेला मजकूर सर्वासमोर वाचून दाखवला. त्यात नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास विनायक राणे याचे नाव निश्चित केल्याचे नमूद केले. त्यानंतर दुपारी तहसीलदारांसमक्ष काँग्रेसतर्फे विनायक राणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *