आयपीएलच्या नवव्या मोसमातील महत्त्वपूर्ण लढतीत गुरुवारी (१९ मे) माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ गुजरात लायन्सशी दोन हात करेल. गुणतालिकेत दोन्ही संघ पहिल्या चार संघांत असल्याने चुरशीची लढत अपेक्षित आहे.
कोलकाता आणि गुजरातचे वैशिष्टय़ म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी १२ सामन्यांतून ७ विजय ( १४ गुण) मिळवलेत. मात्र सरस धावगतीवर कोलकाता दुस-या स्थानी आहे. गुजरात चौथ्या स्थानी स्थिरावला आहे.
सांघिक कामगिरीत सातत्य राखताना उभय संघ अव्वल चार संघांतील स्थान राखण्यास उत्सुक आहेत. दोन्ही संघांना ‘प्ले ऑफ’ फेरी गाठण्याची संधी असली तरी एकेक विजय पुरेसा ठरणार नाही.
कोलकात्याची उर्वरित मॅच अव्वल स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद तसेच गुजरातची गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. त्यामुळे गुरुवारच्या लढतीच्या निकालावर उभय संघांची वाटचाल अवलंबून राहिल.
कोलकात्याची सर्व आघाडयांवर चांगली कामगिरी होत आहे. मात्र बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवले. कर्णधार गौतम गंभीरसह रॉबिन उथप्पाने चांगले सातत्य राखले आहे. त्यांना युसूफ पठाण आणि मनीष पांडेची चांगली साथ मिळतेय.
गोलंदाजीत मध्यमगती गोलंदाज आंद्रे रसेल, लेगस्पिनर पियुष चावलाने प्रभावी गोलंदाजी केलीय. मध्यमगती गोलंदाज उमेश यादव आणि ऑफस्पिनर सुनील नारायण फार अचूक नसले तरी ब-यापैकी गोलंदाजी करताहेत.
परंतु, मागील लढतीत १५-२० धावा कमी पडल्या. गुजरातही चांगला प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे गौतम गंभीर आणि सहका-यांचाही कस लागेल. लायन्सची फलंदाजीची भिस्त कर्णधार सुरेश रैनासह दिनेश कार्तिक आणि ब्रेंडन मॅककलमवर आहे.
मधल्या फळीतील अष्टपैलू रवींद्र जडेजाने फलंदाजीतील कामगिरी सुधारली आहे. मात्र गोलंदाजी तितकी प्रभावी नाही. ड्वायेन ब्राव्हो आणि धवल कुलकर्णी या मध्यमगती दुकलीने थोडी फार चांगली गोलंदाजी केली तरी त्यांना अन्य गोलंदाजांची अपेक्षित साथ लाभत नाही.