सत्याची व न्यायाची बूज राखणे म्हणजे दबाव असेल तर आठ वर्षांपूर्वी ज्या बनावट पद्धतीने हिंदू दहशतवादाचा बागूलबुवा उभा केला गेला व निरपराध्यांना अडकवले गेले त्यास काय म्हणायचे? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २१ मुसलमान तरुणांना निर्दोष म्हणून सोडले. आम्ही त्याचेही स्वागत करतो व प्रज्ञा सिंह दोषमुक्त झाल्याचाही आनंद व्यक्त करतो. खरे आरोपी बहुधा पाकिस्तानातच पळाले असावेत, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींवरील मोक्का हटविण्यात आल्याचे एनआयएने सांगितले आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेने आपली भूमिका सामनातील अग्रलेखातून मांडली आहे.
शिवसेनेने म्हटले आहे की, मालेगाव बॉम्बस्फोटात नाहक अडकवून ज्यांचा छळ केला अशा सर्व लोकांनी तपास अधिकार्यांवर बदनामीचा गुन्हा दाखल करायला हवा. मालेगाव बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचा प्रकार असल्याची डरकाळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधार्यांनी फोडली. हिंदू कट्टरवादी मंडळींनी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा बोगस तपास तेव्हाच्या ‘एटीएस’ने म्हणजे दहशतवादविरोधी पथकाने केला. साध्वी प्रज्ञा सिंह, ले. कर्नल पुरोहित यांच्यासह सात-आठ लोकांना या प्रकरणात नाहक गोवले. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. यानिमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्याची भरपाई कधीच होणार नाही. बरेच लोक हिंदुस्थानचे दुसरे पाकिस्तान करण्याचे मनसुबे पूर्ण करू इच्छित आहेत व राजकीय स्वार्थासाठी अशा लोकांना पाठबळ मिळत आहे, हाच देशद्रोह आहे! त्यामुळे हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही.