भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे‘च्या (आयसीसी) क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी आज (शुक्रवार) पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. या समितीची मुदत तीन वर्षे आहे.
यापूर्वी, 2012 मध्ये कुंबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आता त्यांना मुदतवाढ मिळाल्याने ते 2018 पर्यंत या पदावर असतील. द्रविडसह श्रीलंकेचे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनाही क्रिकेटविषयक समितीवर संधी मिळाली आहे. या नव्या समितीची पहिली बैठक 31 मे-1 जून या कालावधीत लंडन येथे होणार आहे.
गेल्या समितीमध्ये श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगाकारा यांचा समावेश होता. त्यांची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर द्रविड यांची नियुक्ती झाली आहे. ‘क्रिकेटपटूंचे प्रतिनिधी‘ म्हणून द्रविड या समितीवर असतील. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांनी मिळून द्रविड यांची निवड केली आहे. ‘माजी खेळाडूंचे प्रतिनिधी‘ म्हणून जयवर्धने या समितीवर असतील.