लीलावती हॉस्पिटलमध्ये 24 वर्षांच्या नर्सचा दोन वेळा विनयभंग करून तिच्याशी अश्लील वर्तन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच वांद्रे पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर स्थानिक न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्याला तीन हजार रुपयांचा जामिन मंजूर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शफी जमीर मुजावर असे या
आरोपीचे नाव असून त्याला किडनीच्या आजारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात दाखल करण्यात आले होते. तक्रारदार नर्स पदावर काम करीत असून काही दिवसांपूर्वी ती शफीला औषध देण्यासाठी आली होती. यावेळी त्याने तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. तिने त्याला समज देऊन त्यावेळी सोडून दिले होते. मात्र नंतर त्याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला.