जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
या दहशतवाद्यांकडून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन संघटनेशी संबंधित होते. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, अश्फाक अहमद दार, इश्फाक अहमद बाबा आणि हसीब अहमद अशी त्यांची नावे आहेत.
लष्करी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अंवन्तीपुरा परिसरातील पंझगाम गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती शुक्रवारी रात्री मिळाली होती.
त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून परिसरात शोधमोहिम सुरु होती. दरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले.