राष्ट्रपती राजवट रद्द करणा-या मुख्य न्यायाधीशांची बदली

राष्ट्रपती राजवट रद्द करणा-या मुख्य न्यायाधीशांची बदली

उत्तराखंड राज्यातील राष्ट्रपती राजवट रद्द करून तेथे काँग्रेस सरकारची पुनर्नियुक्तीचा ऐतिहासिक निकाल देणारे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची आंध्र प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. उत्तराखंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच न्या. जोसेफ यांची बदली झाली.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’या मुखपत्राने न्या. जोसेफ हे काँग्रेसचे संबंधित असल्याचा आरोप केला आहे. उत्तराखंडातील काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिश रावत यांचे सरकार बरखास्त करून तेथे केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लावली. या राजवटीला मुख्यमंत्री रावत यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्या. जोसेफ यांनी आपल्या ९९ पानांच्या निकालपत्रात केंद्र सरकारचे महाधिवक्त्यांना धारेवर धरले. राज्य घटनेच्या कलम ३५६ची अंमलबजावणी करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे भान राखण्याचे केंद्राला सुनावले.

या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच अचानक न्या. जोसेफ यांची बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड प्रकरणाची सुनावणी ६ मेपर्यंत पुढे ढकलली आहे. केंद्र सरकारचे महाधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, उत्तराखंडात विश्वासमत प्रस्ताव घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *