कोलकात्याला आणखी एका विजयाची संधी

कोलकात्याला आणखी एका विजयाची संधी

आयपीएल-९मधील बुधवारच्या (४ मे) लढतीत माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स तळातील किंग्ज इलेवन पंजाबशी दोन हात करेल. मागील सहापैकी चार सामने जिंकणा-या गौतम गंभीर आणि सहका-यांचे घरच्या मैदानावर पारडे जड वाटते.

कोलकात्याने आठपैकी पाच सामने जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांच्या मागील सहा लढती ‘अवे’ आहेत. जवळपास तीन आठवडय़ांनी ‘होम ग्राउंड’वर (ईडन गार्डन्स) खेळणारा यजमान संघ सातत्य राखण्यास उत्सुक आहे. सुरुवातीच्या दोन लढतींपैकी दिल्लीला हरवून कोलकात्याने विजयी सलामी दिली तरी गतविजेत्यांसमोर त्यांचे काहीच चालले नाही. सर्व आघाडय़ांवर उंचावलेली कामगिरी हे कोलकात्याचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे. कर्णधार गंभीरसह रॉबिन उथप्पाने ब-यापैकी सातत्य राखले आहे.

त्यांना मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादवची चांगली मदत झाली. बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध अष्टपैलू युसूफ पठाणला सूर गवसल्याने यजमानांची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. कोलकात्याची गोलंदाजीही प्रभावी ठरतेय. मध्यमगती गोलंदाज उमेश यादवने प्रभावी मारा केलाय. मध्यमगती आंद्रे रसेलसह मॉर्नी मॉर्केल तसेच सुनील नारायण आणि पियुष चावला या फिरकीपटूंनी त्याला सुरेख साथ दिली आहे.

पंजाबने नवव्या हंगामातही निराशा केली आहे. सातपैकी दोन सामने त्यांना जिंकता आलेत. फॉर्मात असलेल्या गुजरात लायन्सला हरवत पंजाबने तीन पराभवांची मालिका खंडित केली. मुरली विजयकडे सोपवलेली नेतृत्वाची धुरा पंजाबसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यातच विजयचे सातत्य तसेच अक्षर पटेलला मिळालेला फॉर्म त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र सातत्य राखण्यासाठी अन्य क्रिकेटपटूंनाही कामगिरी उंचवावी लागेल. मिचेल मार्शच्या माघारीमुळे पंजाबची फलंदाजी कमकुवत झालीय.

पाठदुखीमुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकला आहे. नियोजित कर्णधार डेव्हिड मिलरसह ग्लेन मॅक्सवेल, वृद्धिमान साहा, मनन वोहराला अद्याप फॉर्मची प्रतीक्षा आहे. मोहित शर्मा आणि संदीप शर्मा हा मध्यमगती त्रिकुटासह डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने गोलंदाजीचा भार वाहिला आहे. मात्र अन्य गोलंदाजांनी निराशा केलीय. ईडन गार्डन्सवर कोलकात्याचे पारडे जड असले तरी लायन्सविरुद्धच्या विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या पंजाबकडून कडवी लढत अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *