कोलोरॅडो येथील एका गर्भवती युवतीचा गर्भ निर्घृणपणे पाडल्याबद्दल एका महिला आरोपीला येथील न्यायालयाने तब्बल शंभर वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
हा अमानूष प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण अमेरिकेतील जनमानसात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी डॅनियल लेन ही सात वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोषी सिद्ध झाली. हत्येचा प्रयत्न किंवा गर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न या प्रकारच्या खटल्यात अमेरिकन न्यायालयाने सुनावलेली ही सर्वांत मोठी शिक्षा आहे.
मिशेल विलकिन्स असे पीडित 27 वर्षीय तरुणीचे नाव असून, ती मार्च 2015 मध्ये सात महिन्यांची गर्भवती होती. आरोपी डॅनियल लेनने तिला प्रलोभन दाखवून घरी बोलावले आणि तिच्या पोटात चाकू खुपसून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिने मिशेलच्या गर्भातून ते अर्भक जन्माआधीच बाहेर काढले. त्यामुळे त्या बाळाचा थोड्या वेळातच मृत्यू झाला. या हल्ल्यातून बचावलेल्या मिशेलने न्यायालयात दिलेली साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली.
डॅनियलवर हत्येचा प्रयत्न, गर्भवती महिलेचा गर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न यासारख्या सात आरोपांच्या आधारे खटला चालवण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात डॅनियलवर दोष सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. ‘असे घृणास्पद कृत्य कोणी करू शकते यावर विश्वास बसत नाही.’ अशा शब्दांत न्यायालयाने या प्रकरणावर मत नोंदविले.
गर्भातील बाळ मारल्यानंतर डॅनियल लेनने मिशेल हिला जवळच्या एका रुग्णालयात नेले. तिचा गर्भपात झाला असल्याचा दावा केला. परंतु, रुग्णालयातील लोकांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी डॅनियलला अटक केली.