गुजरातची गाठ दिल्लीशी

गुजरातची गाठ दिल्लीशी

आयपीएल-९मध्ये मंगळवारी गुजरात लायन्स संघ दिल्ली डेअरडेव्हिल्सशी दोन हात करेल. घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय मिळवण्यासाठी यजमान उत्सुक आहेत. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी संघ मागील पराभवाचा बदला घेण्यादृष्टीने मैदानात उतरेल.

सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरातने ८ सामन्यांत १२ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. नवव्या हंगामात दोनदा सलग तीन विजय मिळवणारा तो एकमेव संघ आहे. मात्र चौथ्या लढतीत सनरायझर्स आणि आठव्या लढतीत किंग्ज इलेवन पंजाबने त्यांची विजयी मालिका खंडित केली. मागील लढतीत डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि मध्यमगती मोहित शर्माच्या अचूक मा-यासमोर घरच्या मैदानावर ‘हसे’ झाले तरी आरोन फिंच आणि ड्वायेन स्मिथचे सातत्य तसेच दिनेश कार्तिक, कर्णधार रैना आणि ब्रेंडन मॅककलमची ‘पॅचअप’मधील कामगिरी पाहता फलंदाजी मजबूत आहे. मात्र ड्वायेन ब्राव्हो आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाचे अपयश चिंतेची बाब आहे. ब्राव्होने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याला मध्यमगती धवल कुलकर्णी, डावखुरा फिरकीपटू जडेजा आणि लेगस्पिनर प्रवीण तांबेची चांगली साथ लाभलेय.

मध्यमगती गोलंदाज झहीर खानच्या कर्णधारपदाखालील दिल्लीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सहापैकी चार सामने जिंकत त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान राखले आहे. दिल्लीला मागील लढतीत कोलकात्याकडून पराभूत व्हावे लागले. गुजरात आणि दिल्लीमधील पहिल्या लढतीत यजमान दिल्लीला एका धावेने पराभूत व्हावे लागले होते. त्याचा बदला घेण्यासाठी पाहुणे उत्सुक आहे. दिल्ली संघ कुणा एका क्रिकेटपटूवर अवलंबून नाही. फलंदाजीत क्विंटन डी कॉकने चमक दाखवली आहे. ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, संजू सॅमसनची त्याला थोडी मदत झाली आहे. मात्र सलामीवीर श्रेयस अय्यरचे अपयश चिंताजनक आहे. लेगस्पिनर अमित मिश्रासह कर्णधार झहीर खान, ख्रिस मॉरिस आणि क्रेग ब्राथवेटने अचूक मारा केलाय. दिल्लीची कामगिरी चांगली आहे. मात्र सातत्य टिकवण्यासाठी त्यांच्या सर्वच क्रिकेटपटूंना कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *