राजधानी दिल्लीमध्ये एक मेपासून पेट्रोल आणि डिझेलवर चालणा-या सर्व टॅक्सींवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिले.
पेट्रोल व डिझेल टॅक्सीचे सीएनजीमध्ये रुपांतरित करण्याची मुदत येत्या ३० एप्रिल रोजी संपणार असून या मुदतीत आणखी वाढ करण्याची मागणी खासगी टॅक्सी चालकांनी केली होती. मात्र खासगी डिझेल टॅक्सी सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यास मुदतवाढीची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
डिझेलवर चालणा-या गाड्या सीएनजीवर चालवू शकणारी यंत्रणाच उपलब्ध नाही, असा युक्तिवाद टॅक्सी मालकांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात केला. मात्र डिझेल टॅक्सी सीएनजीमध्ये परावर्तित करण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदत देण्यात आली होती. त्यामुळे आता या गोष्टीवर आम्ही अधिक वेळ वाया घालवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.