‘संदीप सावंत घरचाच माणूस, गैरसमजातून जे घडले ते आमचे आम्ही बघून घेऊ’

‘संदीप सावंत घरचाच माणूस, गैरसमजातून जे घडले ते आमचे आम्ही बघून घेऊ’

चिपळूणचे काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांची बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येउन भेट घेतली. यावेळी सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर, ‘सावंत हा आमच्या घरातला माणूस असून जे काही घडले, ते गैरसमजुतीतून घडले आहे. पोलीस तपासात सर्व सत्य बाहेर येईलच,’ असे नारायण राणे यांनी सांगितले.

माजी खासदार निलेश राणे यांनी आपले अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप संदीप सावंत यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी निलेश राणे यांच्यासह काही जणांवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र या प्रकरणात तथ्य नसून हे आरोप खोटे असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले होते. तसेच सावंत यांच्याशी आपले घरचे संबंध असल्याचेही निलेश राणे म्हणाले होते. यानंतर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास अचानक माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे संदीप सावंत यांच्या भेटीसाठी सिव्हिल रुग्णालयात आले. यावेळी ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, बाळकृष्ण पूर्णेकर, नारायण पवार हे देखील त्यांच्यासह उपस्थित होते. यावेळी राणे यांनी संदीप सावंत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना, सावंत हा आपला घरचा माणूस असून जो काही प्रकार घडला आहे, तो केवळ गैरसमजुतीतून घडला असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. शिवाय सावंत यांना मारहाण कुणी केली? केली की नाही? हे सारे वैद्यकीय अहवालात समोर येणारच असून पोलिसही त्यांचा तपास करतच असल्याचे राणे म्हणाले. निलेश राणे आणि संदीप सावंत यांचे घरच्यासारखे संबंध असून निलेश राणे अनेकदा सावंत यांच्या घरी गेले आहेत, तसेच सावंतही आपल्या घरी येतात असे स्पष्ट करतानाच निलेश राणेंनीच सावंत यांना विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली होती, आणि आता जिल्हाध्यक्षपदासाठीही त्यांची शिफारस केली आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

आमचा कार्यकर्ता, आम्ही बघून घेऊ!

यावेळी पत्रकारांनी सावंत यांना मदत करण्याबाबत विचारले असता, संदीप सावंत हा आमचा कार्यकर्ता असून त्याला सर्वतोपरी, लागेल ती मदत करण्यात येईल, असे नारायण राणे म्हणाले. शिवाय हा आमच्या पक्षाचा प्रश्न असून आमचे आम्ही बघून घेऊ, असेही त्यांनी या प्रकरणावरून लक्ष्य करणा-यांना सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *