पद टिकविण्यासाठी पंतांचा कानमंत्र

पद टिकविण्यासाठी पंतांचा कानमंत्र

युतीचं सांभाळलं की काही बघावं लागत नाही, पाच वर्षे काढतात येतात, मुख्यमंत्रिपद कसे टिकवावे, हा कानमंत्र दिला आहे, माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. पंत आणि फडणवीस यांच्यातील ही खासगी मसलत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीतच उघड झाली. खुद्द फडणविसांनीच हे गुपित फोडले.

निमित्त होते उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या पुस्तक प्रकाशनाचे. नाईक यांच्या सार्वजनिक जीवनातील वाटचालीचा धांडोळा घेणाऱ्या ‘चरैवेति..चरैवेति’ या पुस्तक प्रकाशनाचा शानदार सोहळा सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार या सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबरच प्रकाशक आनंद लिमये, पत्रकार श्रीराम पवार आदी उपस्थित होते. तब्बल सव्वादोन तास राजकीय शेरेबाजी आणि कोपरखळ्यांनी रंगलेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु सोमवारपासूनच संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

राम नाईक यांनी पुस्तकलेखनाची प्रक्रिया सांगत असताना, एका दुखद घटनेमुळे मुंबईत झालेले आगमन आणि पुढे मुंबईकर होणे, तीन वेळा विधानसभा आणि सहा वेळा लोकसभेवर निवडून जाणे, या प्रदीर्घ प्रवासातील चढउतार, असा थोडक्यात आपला जीवनपट नाईक यांनी उलगडून सांगितला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून पावणेदोन वर्षांचा कालावधी झाला आहे आणि आता आपण उत्तर भारतीय झालो आहोत, या विधानावर सभागृहात चांगलीच खसखस पिकली.

मुख्यमंत्री व्हायला नशीब लागते आणि ब्राह्मण नसेल तर मुख्यमंत्री होणे अधिक सोपे असते, या पहिल्याच वाक्याला मनोहर जोशी यांनी तुफान टाळ्या घेतल्या. राजकारण करताना शिक्षण चांगले घ्यावे, विशेषत: कोर्टकचेऱ्याही कराव्या लागतात, त्यासाठी वकिलीचेही शिक्षण हवे, असे सांगत राजकीय जीवनाबरोबर मराठी माणसांनी पैसाही बख्खळ मिळवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कालच मला मनोहरपंत भेटले. युतीचं सांभाळलं की बाकी काही बघायला लागत नाही, पाच वर्षे काढता येतात, असा सल्ला त्यांनी दिला आहे, हे राजकीय गुपित मुख्यमंत्र्यांनी उघड केले आणि सभागृहात हास्याचा स्फोट झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले रामभाऊ हे एक सच्चा स्वयंसेवक आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी या वेळी काढले.

सुशीलकुमार शिंदे यांची टोलेबाजी

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या खास खुसखुशीत शैलीत राजकारणातील अनुभव कथन करून उपस्थितांमधून टाळ्या घेतल्या. शरद पवार यांनी पुलोद सरकारात डाव्या-उजव्यांची मोट कशी बांधली आणि त्यात मी स्वत: आणि राम नाईकही सामील झालो होतो, याची आठवण त्यांनी सांगितली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रामाणिक असतात, असे प्रमाणपत्रही त्यांनी देऊन टाकले. आपणही एकदा राज्यपाल झालो, असे सांगत काही राज्यपाल कुरापतीखोर असतात, परंतु रामभाऊ त्यातले नाहीत, वरून एखादा आदेश आला तर, ये मेरे तत्त्व में बैठता नाही, सोचकर बताऊंगा असे ते सांगायला कमी करणार नाहीत, अशी गुगली त्यांनी टाकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *