थरारक पाठलाग : कॉन्स्टेबल जखमी

पुणे :  येथे पोलिसांनी संशयितांच्या केलेल्या थरारक पाठलागामध्ये संशयितांनी कार अंगावर घालून पोलिस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे हा प्रकार घडला असून संबंधित कर्मचारी श्री. केदारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक प्रेम वाघमारे यांना एक कार संशयीतरित्या सूस फाटा, मुंबई-बेंगलोर रोडवरून जात असल्याची माहिती मिळाली होती. या कारला रोखण्यासाठी बीट मार्शल आणि नाईट राउंडचे कर्मचारी चांदणी चौक येथे रवाना झाले.

तेथून त्यांनी या कारचा पाठलाग सुरू केला. ही गाडी त्यांना सुतारदराकडे जाणाऱ्या रोडनजीक पार्क केलेली आढळली.  पोलीस कर्मचाऱ्यांनी या गाडीतील दोघा इसमांना बाहेर येण्यास सांगितले. गाडीतील एका व्यक्तीकडे पिस्तूल होते. हे पिस्तूल त्याने पोलिसांकडे रोखले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गाडी सुरू करून ती पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यात श्री. केदारी यांना गाडी धडकल्याने ते रस्त्याच्या बाजुला फेकले गेले.   या कारला थांबवण्यासाठी वाघमारे यांनी त्यांच्या रिव्हालव्हरमधून एक राउंड फायर केला.

पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी गाडी तशीच पुढे नेली. त्यानंतर काही पोलिसांनी जखमी कर्मचाऱ्याला दवाखान्यात दाखल केले. तर काही पोलीस कर्मचारी या गाडीच्या तपासासाठी गेले. ही गाडीनंतर गोपिनाथनगर येथील टेकडीनजीक टायर फुटलेल्या स्थितीत मिळून आली आहे. यातील दोन्ही संशयित इसम मात्र पळून गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *