बाळासाहेबांनी आपली कला सामान्य माणसाच्या हितासाठी वापरली. त्यातून त्यांच्यातील अद्भुत कलेचेच दर्शन घडते. ते एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. ज्यांच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी सामान्य माणसांचे कर्तृत्व पाहून त्यांना राजकारणात आणून उभारी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे नेतृत्व तयार करण्याचे काम इतर कोणत्याही नेत्याने केले नाही, अशा आठवणी जागवत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या कार्याला सलाम ठोकला.
पुण्यातील सारसबागेसमोरील गरवारे बाल भवनाशेजारील जागेत ‘मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन’ उभारण्यात आले आहे. या कलादालनाचे उद्घाटन शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. पुणे शहराने नेहमीच राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचे स्मरण करण्याचे काम केले आहे. हे या कलादालनाच्या उभारणीतून दिसून येते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू आहेत, की ते एका कलादालनात मावणे शक्य नाही.
त्यामुळे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जागवण्याचे काम महापालिकेने करावे, असे आवाहन पवार यांनी केले. बाळासाहेबांनी आपल्यावरही अनेक व्यंगचित्रे काढली. विशेषत: शारीरिक वजनावर. राजकीय सभेत आम्ही एकमेकांवर कधी हातचे राखून बोललो नाही. एकमेकांची टिंगल करताना कधीच मैत्रीत दुरावा येऊ दिला नाही. प्रेमाचा ओलावा कायम ठेवला. आज राजकारणात असे मित्र खूप कमी दिसतात, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांविषयी एक आठवण जागवताना ते म्हणाले, ‘८-९ वर्षापूर्वी राज्यसभेची एक जागा खाली होती. तिथे मी सुप्रियाची उमेदवारी दिली. फॉर्मही भरला व सहज बाळासाहेबांना फोन करून त्याबाबत सांगितले व विचारले की, शिवसेनेचा उमेदवार कोण असणार? यावर बाळासाहेब भडकलेच, जी मुलगी माझ्या अंगाखांद्यावर खेळली, ती जर खासदार होणार असेल, तर तिच्याविरोधात माझा उमेदवार नाही देणार. पवार बाळासाहेबांना म्हणाले, पण तुमची कमळाबाई? त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘तुम्ही कमळीची काळजी करू नका’. भाजपानेही उमेदवार दिला नाही व सुप्रिया प्रथम बिनविरोध खासदार झाली.
यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, संजय राऊत, अॅड. वंदना चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नीलम गो-हे, बाबू वागस्कर, कलादालनाचे संकल्पक नगरसेवक अशोक हरणावळ आदी उपस्थित होते.