महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानलाही दुष्काळाचे चटके बसत आहेत. राज्यातील 33 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट आहे. एकूण 44 हजार 672 गावांपैकी 17 हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. सरकारने भिलवाडा येथे रेल्वेद्वारे, तर अन्य भागात टॅंकरने पाणी पुरविण्यास सुरवात केली आहे.
“”पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 50 लाख रुपयांचा निधी पूर्वीच मंजूर करण्यात आला असून, नसिराबाद ते भिलवाडादरम्यान पाण्याची वाहतूक सुरू झाली आहे. काही भागांत गरजेनुसार टॅंकरने पाणी पुरविले जात आहे,‘‘ अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी खात्याचे मंत्री किरण माहेश्वरी यांनी दिली. त्या म्हणाल्या, की राज्यातील 90 टक्के पाणी योजना भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, या पाण्याची पातळी खालावली असल्याने जमिनीवरील पाण्याचा वापर केला जात आहे. हातपंपांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. मजूर दिवसाला दोन-तीन हातपंप दुरुस्त करीत आहेत. त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी यांत्रिक वाहनांचा वापर करण्याचे ठरविले आहे. एकूण सात लाख हातपंप दुरुस्तीसाठी 421 जणांचे पथक काम करीत आहे.
“”भिलवाडाला रेल्वेद्वारे पाणी पुरविण्यासाठी दररोज दहा लाख रुपये खर्च केले जात आहेत. सात हजार 364 गावांना पाणीटंचाई जाणवत असून, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,‘‘ असे खात्याचे अधीक्षक अभियंता अखिलकुमार जैन यांनी सांगितले. भिलवाडा, भरतपूर, धोलपूर, करौली, सवाई माधोपूर, जयपूर, अल्वर, दौसा व प्रतापगड या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील पाणीचंटाईवर मात व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपत्कालीन योजना आखावी, अशी मागणी सरकारकडे केली. “”सरकारने टॅंकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करावा; अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. शेती व जनावरांसाठीही पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी,‘‘ असे ते म्हणाले.
