डाळींच्या दरात 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई – पाण्याअभावी तरकारी पिकांचे नुकसान झाले असल्याने त्याचा परिणाम भाज्यांना पर्याय असणाऱ्या डाळींच्या दरावर झाला असून, राज्यभरात सध्या डाळींच्या दरात 15 ते 20 टक्के दराने वाढ झाली आहे.

राज्यात यंदा भयंकर दुष्काळी परिस्थिती असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे बाजारात सध्या पुरेसा भाजीपाला उपलब्ध होऊ शकलेला नाही. हिरवा भाजीपालाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, जो आहे तोही प्रचंड महाग आहे. त्यामुळे सध्या गृहीणींकडून डाळींची मागणी वाढली आहे. त्यामुळे डाळींचे दर कडाडले असून, किरकोळ बाजारात या डाळींच्या दरात तब्बल 15 ते 20 टक्के एवढी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सध्या तूरडाळ 180 रुपये प्रतिकिलो, चनाडाळ 120 रु., मूग डाळ 135 रु., उडीद डाळ 200 ते 220 रु. तर मसूर डाळ 100 रुपये प्रतिकिलो असे भाव पहायला मिळत आहेत.

जगभरात भारत हा डाळींच्या उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो. देशात वर्षाकाठी 2 कोटी 20 लाख टन डाळीची गरज भासते. गरज पडल्यास म्यानमार, टांझानिया, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून तसेच सर्वाधिक डाळही भारतच आयात करतो. सध्या देशभरात अनेक राज्यांत दुष्काळाचा फटका बसला असून त्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दुष्काळामुळे एकूणच देशभरातील डाळ उत्पादनातही घट झाली असून हे उत्पादन केवळ 1 कोटी 85 लाख टन इतके झाले आहे. त्यामुळे बाजारात मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने डाळींच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे डाळींचे दर वाढल्याने बरीच खळबळ माजली होती, सरकारला डाळ आयात करावी लागली होती, मात्र तरीही यंदाच्या हंगामात डाळीचे उत्पादन कमी झालेले असले तरी डाळींचे दर स्थिर राहतील, असे अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *