आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे कधी काळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता सहजशक्य होत आहेत. मानवी शरीरातील विविध अवयवांच्या प्रत्यारोपणाचाही यात समावेश होतो. अमेरिकेत नुकतेच एका 55 वर्षे वयाच्या व्यक्तीवर कवटी आणि डोक्यावरच्या त्वचेचे प्रत्यारोपण करण्यात आले.
जेम्स बॉयसेन असे या व्यक्तीचे नाव असून, तो अमेरिकेतील टेक्सास राज्याचा रहिवासी आहे. प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया सुमारे 15 तास चालली. बॉयसेन यांच्यावर काही दिवसांपूर्वी कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील त्वचा नष्ट झाली होती. त्यानंतर बॉयसेन यांनी डॉक्टरांकडून कवटी आणि त्वचेचे प्रत्यारोपण करून घेण्याचा निर्णय घेतला होता.
या शस्त्रक्रियेदरम्यान किडनी आणि स्वादुपिंडाचेही प्रत्यारोपण करण्यात आले होते. टेक्सासमधील होस्टन मेथोडिस्ट रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेत तज्ज्ञ डॉक्टरांसह 50 जणांच्या पथकाने भाग घेतला. बॉयसेन हे पेशाने सॉफ्टवेअर अभियंते आहेत. या प्रत्यारोपणामुळे त्यांना नवीन जीवन मिळाले आहे. या अनोख्या शस्त्रक्रियेमुळे आपण अतिशय आनंदी असून, आवडीच्या गोष्टी करण्याची संधी पुन्हा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
