छगन भुजबळ यांच्या कंपनीचा संचालकच माफीचा साक्षीदार?

छगन भुजबळ यांच्या कंपनीचा संचालकच माफीचा साक्षीदार?

‘महाराष्ट्र सदन’ आणि इंडिया बुल्स प्रकरणात तब्बल ८७० कोटींची माया गोळा केल्याचा आरोप असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात त्यांच्याच कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपनीच्या एका संचालकालाच माफीचा साक्षीदार करण्याचे सक्तवसुली महासंचालनालयाने ठरविले आहे. त्यामुळे तब्बल दोनशे कोटींच्या रोख रकमेची कशी विल्हेवाट लावण्यात आली, याचा पुरावाच या निमित्ताने महासंचालनालयाच्या हाती आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या दोन्ही प्रकरणांत महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर यांना अटक झाली असून दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. महासंचालनालयाने आरोपपत्रही दाखल केल्यामुळे आता दोघांनाही जामीन मिळणेही कठीण झाले आहे. या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी सुरूच असून नवनवीन माहिती समोर येत आहे. परंतु चौकशीत छगन भुजबळ तसेच समीर यांनी काहीही सांगण्यास नकार दिल्यामुळे अखेरीस महासंचालनालयाने सुरुवातीला आरोपी म्हणून नमूद केलेल्या कंपनीच्या एका संचालकाला माफीचा साक्षीदार केले आहे.

विविध शासकीय कंत्राटातून मिळालेल्या काळ्या पैशाची भुजबळ कुटुंबीयांनी कशी विल्हेवाट लावली, हा काळा पैसा कोलकात्यातील कोणत्या कंपन्यांना पुरविण्यात आला आणि त्या मोबदल्यात भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांमध्ये धनादेशाद्वारे कशी रक्कम घेण्यात आली, हेही त्याच्या जबाबातून उघड झाले आहे. त्याचाच वापर भुजबळांविरुद्ध केला जाणार असल्याचे कळते. सक्तवसुली महासंचालनालयाकडून आतापर्यंत अडीचशे कोटींच्या मालमत्तेचा माग घेण्यात यश आले आहे. अद्याप सहाशे कोटींच्या मालमत्तेचा स्रोत शोधणे बाकी असले तरी भुजबळ चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे आता वेगळ्या मार्गाचा वापर केला जाणार आहे. भुजबळांचे सनदी लेखापाल यांच्या जवाबांचाही वापर करण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

नाममात्र संचालकपद

* छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या ‘मुंबई एज्युकेशन ट्रस्ट’मधील काही कर्मचाऱ्यांनाच संचालक बनविण्यात आले, मात्र त्यांना काहीही अधिकार नव्हते.

*प्रत्यक्षात ते नाममात्र संचालक होते आणि समीर भुजबळ यांच्या आदेशानुसार ते वागत होते.

* त्यामुळे या कथित संचालकांचा प्रत्यक्ष व्यवहाराशी काहीही संबंध नसल्यामुळे त्यांचा जवाब खटल्याच्या वेळी उपयोगी पडणार आहे.

* या सर्वाचा आरोपी म्हणून जवाब नोंदविण्यात आला असला तरी त्यांना माफीचा साक्षीदार केले जाणार आहे

* त्यामुळे या गुन्ह्य़ांमध्ये अप्रत्यक्षपणे या कर्मचाऱ्यांचा सहभाग असला तरी भुजबळांविरुद्ध ठोस पुरावा ठरू शकतो, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *