सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची स्विफ्ट कारने जगभरात ५० लाख विक्रीचा आकडा पार केला असून त्यात भारताचा वाटा ५४ टक्के आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
५० लाख कारपैकी ५४ टक्के कार भारतात विकल्या गेल्या आहेत. युरोपात १७ टक्के, जपानमध्ये १० टक्के तर उर्वरित जगात १९ टक्के कार विकल्या गेल्या आहेत. स्विफ्ट ही खरोखर जागतिक लोकप्रिय कार असून जपान, हंगेरी, भारत, चीन, पाकिस्तान आणि थायलंड या देशांत बनवली जाते.
भारतासारख्या उभरत्या बाजारपेठेत तिचा मोठय़ा प्रमाणात स्वीकार केला जात असून तिला पसंतीही मिळत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. २००४ मध्ये स्विफ्ट लॉँच झाल्यापासून तिचे मॉडेलमध्ये अनेक नावीन्यपूर्ण बदल केले असून स्पोर्टी, स्टायलिश रूपाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
भारतात २००५ मध्ये स्विफ्ट लाँच करण्यात आली असून तेव्हापासून भारताची विकसित होणा-या बाजारपेठेबरोबरच डिझेल आणि सेडानच्या समावेशामुळे तिच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत भारतात २७ लाख हॅचबॅक आणि सेडान स्विफ्ट कारची विक्री झाली आहे. सध्या या कारची किमत ४ लाख ७१ हजार रुपयांपासून ते ७ लाख ४३ रुपयांपर्यंत आहे.
