महेश मोतेवारला न्यायालयीन कोठडी

गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फुड इंडिया लि. चे महेश किसन मोतेवार (46, रा. धनराज हाईट्‌स, धनकवडी पुणे) याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान ओरिसा कटक न्यायालयाच्या आदेशानुसार मोतेवार याला कटक येथील तुरूंगात नेण्यात येणार आहे.

याबाबत सुनिता चंद्रकांत धनवे (रा. गणेशखिंड रोड, खैरेवाडी) यांनी या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मोतेवार याच्यावर 20 नोव्हेंबर 2014 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनवे यांनी समृद्ध जीवन फुड इंडिया लि. या कंपनीत जून 2009 मध्ये 5800 रुपयांची गुंतवणूक केली होती. पुढील चार वर्षासाठी प्रत्येकवर्षी 5800 रुपये इतकी रक्कम भरावयाचे ठरले होते. त्यांना 2019 मध्ये त्यानुसार 95 हजार 700 रुपये एवढी रक्कम मिळणार होती. याबाबतचे प्रमाणपत्रही कंपनीने धनवे यांना दिले होते.

कंपनीच्या प्रतिनिधींनी धनवे यांना या पैशातून शेळ्या, मेंढ्या, म्हशी खरेदी केली जाईल असे असे सांगितले होते. त्यानंतर धनवे यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेसोबत त्याचे फायदे मिळावेत यासाठी कंपनीकडे वारंवार जाऊन विचारणा केली. परंतु, त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यांनी कंपनीबाबत अधिक माहिती घेतली असता कंपनी जनतेकडून पैसे गोळा करते म्हणून सेबीने या कंपनीवर पैसे गोळा करण्यास निर्बंध घातल्याचे व गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना फसविले असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे धनवे यांनी याबाबत राज्य चतृ:श्रृंगी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखने मोतेवार याला अटक केलीहोती. या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी मोतेवार याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड. सुनील हांडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *