कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणात झारखंडमधील इस्पात या खासगी कंपनीच्या दोन संचालकांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (सोमवार) इस्पातचे संचालक आर. एस रुंगठा आणि आर. सी. रुंगठा यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. या दोन्ही संचालकांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. विशेष न्यायालयाने दोघांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, तसेच त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इस्पात कंपनीला देखील दंडापोटी 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार असताना कोळसा खाण वाटप गैरव्यवहार उघडकीस आला होता. या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत.
