संविधानाला धक्का लावल्यास त्यांचे हात छाटू असे परखड मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
मोदींसोबत आहे म्हणून माझ्यावर अनेकांकडून टिका होते. मात्र मोदींसोबत आहे म्हणून आम्ही त्यांचे विचार स्विकारले नाहीत तर आम्ही कालही आंबेडकरवादीच होतो आणि उद्याही आंबेडकरवादीच राहू.
आमच्यात अनेक गट- तट असले तरी सर्वजण आंबेडकरवादी विचारानेच कार्य करीत आहोत. यापूढे सर्व गट- तट एकत्र येत असल्यास बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार असेन, असेही ते यावेळी म्हणाले.
गीतकार प्रभाकर पोखरीकर यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा आघात झाला होता. त्यांना आर्थिक सहाय्यासाठी आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांसह अनेक गायक कलावंताना एकाच मंचावर एकत्र आणून त्या कार्यक्रमातून जमा होणारा निधी पोखरीकर यांना आजारपणातून बरे होण्यासाठी ‘गौरव निधी’ म्हणून हा कार्यक्रम ‘सम्यक कलामंचा’च्या वतीने परळ येथील दामोदर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आठवले प्रमुख उपस्थिती म्हणून बोलत होते.