शिवसेनेची भ्रष्टाचाराला साथ ५०० कोटींचे प्रस्ताव सात मिनिटांत मंजूर

देवनार कचरा भराव भूमीला लागलेल्या आगीच्या धुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्यांसाठी महापालिकेतील आक्रमक विरोधकांनी स्थायी समितीच्या बैठकीतून मंगळवारी सभात्याग केल्याचा फायदा घेत शिवसेनेने अवघ्या सात मिनिटांमध्ये तब्बल ५५० कोटी खर्चाचे ५४ प्रस्ताव मंजूर करून घेतले. यात प्रामुख्याने रस्ते आणि नालेसफाईची मलईदार कंत्राटे देण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

नालेसफाईच्या कामांबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मोठय़ा नाल्यांच्या सफाईचे कंत्राट दिले जात असताना या बैठकीत सत्ताधारी पक्षांतील कुणीतरी नावाला तरी तोंड उघडेल, अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेना-भाजपाच्या एकाही सदस्याने या झटपट मंजुरीला आक्षेप घेतला नाही.

स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेमध्ये देवनार कचरा भराव भूमीला वारंवार लागणा-या आगीप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी झटपट सभा तहकुबी मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उत्तर देत सदस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला; परंतु या उत्तराने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मनसे या विरोधी पक्षांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग करत समिती दालनाबाहेर ठिय्या मारला. प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचा तीव्र निषेध दालनाबाहेर व्यक्त करत असतानाच इकडे बैठक सुरू ठेवत सत्ताधा-यांनी भ्रष्टाचाराची पाठराखण केली.

विरोधकांनी ४ वाजून ०८ मिनिटांनी सभात्याग केल्यानंतर पुढील काही मिनिटांमध्ये अनुकूल-प्रतिकूल करत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सर्व प्रस्ताव मंजूर केले. विशेष म्हणजे या ५४ प्रस्तावांपैकी एकाही प्रस्तावावर सदस्यांनी चर्चा केली नाही. महापालिकेने मागील वर्षी नालेसफाईच्या कामांना दोन वर्षासाठी २८५ कोटींच्या प्रस्तावांसह इतर विकास कामांच्या प्रस्तावांना अवघ्या ९ मिनिटांमध्ये मंजुरी दिली होती. त्याची पुनरावृत्ती या घडामोडींतून दिसून आली. नालेसफाईच्या कामांमधील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर तसेच रस्ते कामांमधील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी सुरु असतानाही स्थायी समितीने विरोधकांच्या अनुपस्थितीत त्याच स्वरूपाच्या प्रस्तावांना विनाआक्षेप ‘मंजुरी’ दिल्यामुळे या भ्रष्टाचाराला एकप्रकारे पाठिशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

कंत्राट खर्चाच्या महत्त्वाच्या काही प्रस्तावांना दिलेल्या मान्यता

जकात खात्याचे संगणकीकरण, कंत्राट रकमेत वाढ (६.१३ कोटी)

चरई स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनी पीएनजीत रुपांतर (१.१६ कोटी)

अंधेरी पश्चिम,गोरेगाव आणि मालाडमधील लहान रस्त्यांचे डांबरीकरण (११७.०२ कोटी)

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या वीर सावरकर पूल ते प. द्रु. महामार्गाची दुरुस्ती (१३.९२ कोटी)

कांदिवली,बोरिवली आणि दहिसरमधील लहान रस्त्यांचे डांबरीकरण (५१.३८ कोटी)

पश्चिम उपनगरातील मोठय़ा नाल्यांची सफाई (२८.७८ कोटी)

पूर्व उपनगरातील मोठय़ा नाल्यांची सफाई (१५.५६ कोटी)

अग्निशमन दलासाठी क्वीक रिस्पॉन्स मल्टी पर्पज वाहनांचा पुरवठा (४२.४५ कोटी)

डहाणुकर वाडी स्मशानभूमीच्या विद्युतदाहिनीचे पीएनजीत रुपांतर (७९ लाख)

पश्चिम उपनगरातील ९ रस्त्यांचे अल्ट्रा टॉप व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानाद्वारे बांधकाम (२१.०४ कोटी)

गिरगाव चंदनवाडी परिसरातील ३ रस्त्यांचे डांबरीकरण (४.८१ कोटी)

पश्चिम उपनगरातील परि. ३ मधील खराब रस्त्यांची पावसाळापूर्व दुरुस्ती (६.६९ कोटी)

पश्चिम उपनगरातील परि. ४ मधील खराब रस्त्यांची पावसाळापूर्व दुरुस्ती (६.६९ कोटी)

पश्चिम उपनगरातील परि. ७ मधील खराब रस्त्यांची पावसाळापूर्व दुरुस्ती (६.८४ कोटी)

मानखुर्द, देवनार, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड भागातील रस्त्यांची सुधारणा (३७.६२ कोटी)

रस्त्यांवरील चर भरणीच्या कंत्राटात वाढ (२७.५० कोटी)

मरीन ड्राईव्हच्या रस्ते कंत्राट खर्चात फेरबदल (५० कोटी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *