शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट लष्कर-ए-तोयबाने आखला होता. त्यांना ठार करण्याची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवली होता. मात्र त्या व्यक्तीला अटक झाली, त्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला, अशी खळबळजनक साक्ष दहशतवादी डेव्हिड हेडलीने दिली.
अमेरिकेतून हेडलीची साक्ष व्हीडिओ कॉन्फरसिंगने झाली. अबू जुंदालचे वकील अब्दुल वहाब खान यांनी सलग दुस-या दिवशी हेडलीची उलटतपासणी घेतली.
हेडलीने न्यायालयाला सांगितले की, मी दोन वेळा सेना भवनला भेट दिली होती. मात्र, नेमके वर्ष आपल्याला आठवत नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा लष्कर-ए-तोयबाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ठार करायचे होते. ते शिवसेनेप्रमुख होते ही बाब मला माहिती होती. मात्र, तोयबाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. या कारवाईसाठी नेमलेल्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून निसटला, असे त्यांनी सांगितले.
२६/११च्या हल्ल्याच्या तयारीसाठी तू किती पैसे खर्च केलेस यावर हेडली म्हणाला की, मला नेमका आकडा सांगता येणार नाही. अंदाजे ३० ते ४० लाख रुपये. हा सर्व खर्च आयएसआयने केला होता. मी त्यांच्याकडून पैसे मागून घेतले होते. २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर अल-कायद्याच्या वतीने भविष्यात हल्ल्याच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी भारतात आलो होतो. अल-कायदाचा नेता इलियास काश्मिरीने मला पाकिस्तानचे एक लाख रुपये दिले होते, असे त्याने सांगितले.