सुरुवातीपासूनच फायद्यात असलेल्या आणि रस्त्यावरील मालवाहतुकीला चांगला पर्याय असेलल्या कोकण रेल्वेची रो रो सेवा आता नियमित कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणार आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ७३ कोटी १६ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षीपेक्षा ते सुमारे सहा कोटींपेक्षा जास्त आहे.
कोकण रेल्वेच्या वैशिष्टय़पूर्ण ‘रोल ऑन रोल ऑफ’ अर्थात ‘रो रो सेवे’ने कोकणातून होणा-या मालवाहतुकीचा सर्वात मोठा भार गेल्या १६ वर्षात उचलला आहे. २६ जानेवारी १९९९ मध्ये ही सेवा कोकण रेल्वेने सुरू केली; त्या वेळी सुरुवातीला याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. रेल्वेवरून मालाने भरलेल्या ट्रकची वाहतूक होणे ही कल्पना तेव्हा व्यावसायिकांना फारशी रुचली नव्हती. त्यामुळे रो रो सेवेच्या पहिल्या फेरीला मालाने भरलेल्या केवळ पाचच ट्रकची वाहतूक झाली होती; परंतु केवळ वेळच नव्हे; तर इंधन, माल चढवणे, उतरवणे यासाठी मोठय़ा प्रमाणात लागणारे मजूर, रस्ते वाहतुकीदरम्यान ट्रॅफिकमुळे होणारा खोळंबा आणि वायू प्रदूषण या सर्वावर या रो -रो सेवेने चांगला पर्याय उपलब्ध करून दिला.
त्यामुळे गेल्या सोळा वर्षात या रो-रो सेवेद्वारे ३ लाख ६६ हजार ४०३ ट्रकची वाहतूक झाली आहे. १९९९ पासून कार्यान्वित झालेली कोकण रेल्वेची ही रो-रो सेवा कोलाड-वेरणा हा ४१७ किमीचा मार्ग ८ ते १० तासात, कोलाड-सुरथकल हा ७२१ किमीचा मार्ग सुमारे २१ ते २४ तास तर अंकोला-सुरथकल हा २०५ किमीचा मार्ग ३ ते ५ तासांत पूर्ण करते. दिवसेंदिवस या सेवेला व्यावसायिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सध्या आठवडय़ातून एक दिवसच सुरू आहे; परंतु ही सेवा नियमित सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्नशील आहे.
यातून कोकण रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. एकावेळी रो रो च्या एका फेरीत ४२ ट्रक नेले जातात. त्यातील एका १५ टन वजनाच्या ट्रकसाठी कोकण रेल्वे ८ हजार ९७४ तर ४० टनी वजनाच्या एका मालवाहतूक ट्रकसाठी सुमारे २३ हजार २६२ रुपये इतके भाडे आकारते. तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात सप्ताहातून केवळ एक फेरी करून कोकण रेल्वेला ५५ हजार ९२१ ट्रक वाहतुकीतून ७३ कोटी १६ लाख रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्याच्या आधीच्या वर्षी हेच उत्पन्न ६७ कोटी २० लाख इतके होते.