कुष्ठरोग, मलेरिया आणि माकडताप आदी आजाराने सिंधुदुर्गातील जनता हैराण असताना आरोग्य खात्यातील हजारो पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा संभाळण्यास सक्षम नसल्याचे टीकास्त्र विरोधकांनी डागले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर व अन्य चार सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तर देताना ही पदे रिक्त असल्याचे मान्य केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वर्ग-८ची एकूण मंजूर २९ पदांपैकी २० पदे रिक्त आहेत. गट-अ संवर्गाची एकूण १६२ पैकी ५४ पदे रिक्त आहेत. तर गट ‘क’ संवर्गाच्या एकूण मंजूर १ हजार १८ पैकी केवळ ८८३ पदे भरली आहेत. तर गट ‘ड’ संवर्गाची एकूण ३९० मंजूर पदांपैकी केवळ २८५ पदेच भरण्यात आली आहेत.