राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केल्यानंतर मंगळवारी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने भुजबळ यांना दोन दिवसांची इडी कोठडी सुनावली आहे.
सोमवारी रात्री अटक केल्यानंतर सोमवारची रात्र भुजबळांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयातच घालवली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यापुर्वी त्यांची सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
महाराष्ट्र सदन आणि अन्य ११ प्रकरणात घोटाळा तसेच बेहिशोबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात भुजबळ चौकशी अधिका-यांना सहकार्य करत नाहीत, असे ईडीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
छगन भुजबळ हे चौकशीला सहकार्य करीत नाहीत. भुजबळांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर संशय आहे. मंत्रीपदाचा गैरवापर करून पैसा गोळा केला, असा दावा ईडीने केला आहे. भुजबळ यांच्या कंपनीतील संचालक बनावट असल्याचा आरोपही ईडीने केला आहे. त्यामुळे अधिक व पुढील चौकशीसाठी छगन भुजबळ यांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी सत्र न्यायालयात केली.