गुन्हेगार असलेल्या पोटच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आईनेच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
अक्षय रामदास मालपोटे (२०) या तरुणाची हत्या झाली. या प्रकरणी इंदुबाई रामदास मालपोटे (४०), गणपत ज्ञानेश्वर मालपोटे (३२), बाबाजी धोंडीबा यादव (१९), अरुण शांताराम अडसुळ (५०) आणि पप्पू उर्फ अशांत सुरेश भिंताडे (२२) यांना अटक केली आहे.
अक्षय मालपोटे हा आपल्या कुटुंबासोबत पुण्यातील कोथरुड येथील किश्कींदानगर येथे राहत होता. तो कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता.
वस्तीमध्ये दहशत निर्माण करुन वस्तीमधील लोकांना व स्वतःच्या नातेवाईकांनी त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून आईनेच नातेवाईक व वस्तीतील लोकांशी संगनमत करुन त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह ताम्हिणी घाट येथील दरीत टाकून दिला.
दोन डिसेंबर २०१५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अक्षय दारु पिऊन शेजारील लोकांना व त्याच्या घरातील लोकांना त्रास देत होता. शेजारी राहणा-यांना तो घराबाहेर काढून मारहाण करीत होता. त्यावेळी अक्षयचा चुलता, शेजारी राहणारे आणि अक्षयची आई इंदुबाई मालपोटे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना सुध्दा अक्षयने मारहाण करण्यास सुरूवात केली.
शेजारी राहणा-या अरूण अडसुळ यांनी रस्त्यावर पडलेला फरशीचा कडप्पा हा अक्षय याच्या डोक्यात मारला. तरीदेखील अक्षय त्यांना मारहान करत होता. वैतागलेल्या आईने अखेर अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. तो खाली पडल्यानंतर गणपत मालपोटे व बाबाजी यादव यांनी अक्षयला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली.