पुण्यातील मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर

शहरातील नियोजित मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याच्या हालचाली सुरू असतानाच एका स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे तो लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मेट्रोला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
शहरातील मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या मार्गांचा सुधारित अहवाल आल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये पाठविण्यात आला असून, जानेवारीत त्याला केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार नगरविकास खात्याच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र, शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पाबाबत आक्षेप घेतल्याने अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असलेल्या प्रकल्पासमोर अडचण निर्माण झाल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. 
 
संबंधित संस्थेच्या आक्षेपाबाबत नगरविकास खात्याने महापालिकेकडे विचारणा केली असून, त्याबाबत खुलासा मागविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, संस्थेचा नेमका आक्षेप सांगण्यास त्यांनी नकार दिला. परंतु त्यासंदर्भात केंद्र सरकारला खुलासा केला जाणार असून, त्यानंतर लवकरच प्रकल्पाला मंजुरी मिळेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *