नोकरीचा शोध आता ‘मराठीत’

मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच बीडमधील अंबेजोगाई गावातील दोन तरुणांनी नोकरी-करियरच्या शोधाकरिता उपयुक्त होईल, असे संपूर्ण मराठी भाषेत सुरू केलेले ‘जॉबचजॉब डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ अवघ्या दीड वर्षांत ते चांगलेच लोकप्रिय झाले आहे. नोकरीच्या शोधात असलेले साधारण ४० ते ५० हजार युवक या संकेतस्थळावर दररोज भेट देतात. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर नितिन देशमाने आणि आदित्य कराड हे तरुण नोकरी मिळविण्यासाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील सरकारी पदांसाठी अर्ज करीत होते. नोकरीसाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीतून त्यांना संकेतस्थळाची कल्पना सुचली. ही कल्पना त्यांनी दीड वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणली. सुरुवातीच्या दिवसात संकेत स्थळाच्या प्रसिद्धीसाठी खूप प्रयत्न करावे लागले. गावात येणाऱ्या एसटी गाडय़ांवर प्रसिद्धीपत्रक चिटकवून, महाविद्यालयातील तरुणांना भेटून संकेतस्थळाची माहिती दिली. ‘जॉबचजॉब’वर शैक्षणिक पात्रतेनुसार पदविका, पदवी, पदव्युत्तर तरुणांसाठी वेगळे विभाग करण्यात आले असून अभियांत्रिकी, वैद्यकीय, बँक, पोलीस अशा विविध क्षेत्रातील नोकरभरतीची माहिती दिली जाते. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील पदांसाठी लागणारा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आदी महत्त्वाच्या बाबीदेखील संकेत् स्थळावर देण्यात आली आहे. ही सर्व माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळविण्याचीही सोय आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न असलेल्या हजारो तरुणांना एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होते. मराठीत नोकरीचा अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील ‘जॉबचजॉबवर’ उपलब्ध असल्याने ग्रामीण तरुणांना प्रवेश अर्ज करणे सोपे जाते. त्यामुळे हे संकेतस्थळ तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते आहे. सध्यातरी या संकेतस्थळाकडे फारशा जाहिराती नाहीत. मात्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरीचे अर्ज विकत घेण्याची क्षमता नसणाऱ्या तरुणांना एकाच ठिकाणी सर्व अर्ज उपलब्ध झाल्यामुळे या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *