गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाच्या सोहळ्यातील महाराष्ट्र रजनीमध्ये सदोष इलेक्ट्रीक सर्किटमुळेच आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दोनदा मनाई केलेली असतानाही सोहळ्याचे आयोजक कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) आणि इव्हेन्ट कंपनी व्हिजक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेन्मेंट यांनी घटनास्थळी गॅस सिलिंडर आणले होते असा ठपका ठेवतानाच या दोन्ही कंपन्यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणे अग्निरोधक यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्याचा निष्कर्षही अग्निशमन दलाच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे. अग्निशमन दलाने हा अहवाल आज महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. गिरगाव चौपाटीवर रंगलेल्या महाराष्ट्र रजनीत लागलेल्या आगीचा अहवाल दोन दिवसांत देतो म्हणून सांगणार्या अग्निशमन दलाने हा अहवाल बनविण्यासाठी दहा दिवस घेतले. १२ साक्षीदारांची साक्ष असलेल्या १४२ पानांच्या या अहवालात आगीची कारणे आणि आगीच्या स्वरूपावर भर देण्यात आला आहे. तसेच आगीबाबत व्हिजक्राफ्ट कंपनी आणि सीआयआयवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र आगीबाबत कोणालाही थेट जबाबदार धरण्यात आलेले नाही. ११ फेब्रुवारी रोजी सीआयआय आणि व्हिजक्राफ्टला कार्यक्रमासाठीची एनओसी देण्यात आली होती. त्यात कार्यक्रमाच्या ठिकाणी सिलिंडर आणू नका असे स्पष्ट बजावण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आयोजकांना घटनास्थळाची पाहणी अहवाल दिला होता. त्यातही कार्यक्रमाच्या ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करू नका असे बजावले होते. मात्र तरीही कार्यक्रमाच्या स्थळी गॅस सिलिंडर आणण्यात आले. आग लागली तेव्हा एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग आणखीनच भडकली. त्यामुळे संपूर्ण स्टेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर कार्यक्रमस्थळीच पाच भरलेले गॅस सिलिंडरही आढळल्याचे या अहवालात म्हटले आहे. व्हिजक्राफ्टला लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्हिज क्राफ्टने जाणून बुजून या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. तसेच सदोष इलेक्ट्रिक सर्किटमुळे ही आग लागल्याचा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. ज्योतीपासून श्रीगणेशाची प्रतिमा साकारायची होती आगीच्या ज्योतीपासून श्रीगणेशाची प्रतिमा साकारायची होती, त्यामुळे कार्यक्रमस्थळी गॅस सिलिंडर आणण्यात आले होते, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. तसेच एका साक्षीदाराने तर गणेश प्रतिमा साकारण्यासाठी गॅस सिलिंडर आणणे हा कार्यक्रमाचा भागच असल्याची साक्ष दिली आहे. तर दुसरे साक्षीदार व्हिजक्राफ्टचे डेप्युटी मॅनेजर प्रशांत सावंत यांनी शॉर्टसर्किटमुळेच आग लागण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. आग का भडकली… – स्टेजखाली ज्वालाग्रही पदार्थ ठेवण्यात आले होते. – कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते लाकडी बांधकाम, पडदे, कापडी फलक, प्लायवुड आणि एफआरपी मटेरियलमुळे आग भडकली. – शोभेच्या फटाक्यांमुळे आग भडकली. – इलेक्ट्रिक वायरिंगचे जाळे – विविध प्रकारचे लाईट, क्रेन आणि पायरोटेक्निक – स्टेजच्याखाली लागलेली आग लवकर दिसली नाही, पण जेव्हा लक्षात आले तोपर्यंत आगीने पेट घेतलेला होता. – स्टेजच्या खाली पेंटचे डब्बे होते – क्रेनमधून हायड्रोलिक ऑईल टपकत होते – प्लायवूड, कपडे आदी भंगार सामानामुळे आग वेगाने पसरली. – See more at: http://www.saamana.com/mainpage/chupatiwaril-aagila-vhizcrafat-jababdar#sthash.rLPWoaP4.dpuf
मेक इन इंडियाच्या सोहळ्यातील आगीला व्हिझक्राफ्ट जबाबदार
