नेपाळमधील पोखरा विमानतळावरून उड्डाण घेतलेले खासगी प्रवासी विमान बुधवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानात ३ कर्मचाऱ्यांसह एकूण २३ प्रवासी होते. प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. नेपाळमधील पर्वतरांगांमध्ये हे विमान बेपत्ता झाले असून, त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतो आहे.
तारा एअर या खासगी कंपनीचे हे विमान पोखरा ते जॉमसम या २० मिनिटांच्या प्रवासासाठी निघाले होते. नेपाळमधील प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसात वाजता या विमानाने पोखरामधून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मुत्सांगचे पोलीस प्रमुख हरिहर योगी यांनी हे विमान बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमानामध्ये एकूण २० प्रवासी आणि तीन कर्मचारी होती. प्रवाशांमध्ये दोन परदेशी प्रवासी आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
