देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस. ए. आर. गिलानी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
गिलानी यांना मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. संसद मार्ग पोलिसांनी सोमवारी रात्रीच प्राध्यापक गिलानी यांना ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना दुपारी पटियाला हाउस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गिलानी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
१० फेब्रुवारीला प्रेस क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गिलानी आणि अन्य तीन वक्त्यांबरोबर मंचावर असलेल्या एका समूहाने अफजल गुरु आणि काश्मीर स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. अफझल गुरू, मकबूल बट्ट यांचा उल्लेख त्यांनी शहीद असा केला होता. त्यानंतर १२ फेब्रुवारीला पोलिसांनी गिलानी यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
गिलानी हे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असल्याने त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. गिलानी यांच्यावर कलम १२४ अ देशद्रोह, १२० ब गुन्हेगारी कट रचणे आणि कलम १४९ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी २००१ मध्ये झालेल्या संसद हल्ला प्रकरणीही गिलानी यांना अटक करण्यात आली होती. परंतू पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले होते.