येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा या भागात येत्या ४८ तासांत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागातर्फे वर्तवली आहे. लक्षद्वीप ते गुजरात दरम्यान ‘ट्रफ’ (द्रोणीय स्थिती) निर्माण झाल्याचा परिणामी राज्यातील काही भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता असल्याचे कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील विविध भागात थंडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. फेब्रुवारीतही अद्याप किमान तापमानात म्हणावा तसा फरक पडलेला नाही. बहुतांश भागात किमान तापमानचा पारा १५ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर आहे. मुंबईत शहर, परिसरात थंडीचा लहरीपणा दिसत आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला किमान तापमानाचा पारा आता थेट २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर असल्याने पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा असे संमिश्र वातावरण मुंबईकरांना अनुभवण्यास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *