गिरगावची आग फायरो टेक्निक, एलपीजीमुळेच

गिरगावची आग फायरो टेक्निक, एलपीजीमुळेच

‘मेक इन इंडिया’अंतर्गत गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र संगीत रजनी कार्यक्रमाच्या व्यासपीठाला लागलेली आग ही ‘फायरो टेक्निक’मुळेच लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्टेजवरील एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन फायरो टेक्निकलच्या सहाय्याने ही आग जास्त भडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ही आग लागल्यानंतर सुरक्षेसाठी उभारलेल्या मेटल डिटेक्टर्स, बॅरिकेट व पत्र्यांच्या पार्टिशन्समुळे वाहनांना आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते, असे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

महाराष्ट्र संगीत रजनीच्या व्यासपीठाला आग लागून तो परिसर खाक झाला. अग्निशमन दलाची दोन फायर इंजिन तेथे होती. त्यांच्या मदतीने उपस्थित अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी जवानांसह ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेमुळे आगीचे लोळ पसरून ती मोठय़ा प्रमाणात भडकली. त्यामुळे अखेर दोन क्रमांकाची आग घोषित करून मदतीसाठी अग्निशमन दलाचे १४ फायर इंजिन व जास्तीत जास्त पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आणि रात्री दहा वाजता ही संपूर्ण आग आटोक्यात आणली गेली.

या कार्यक्रमासाठी बांधलेल्या प्रमुख व्यासपीठासह सजावटीचे सामान, वायरिंग, स्पीकर, कारपेट, टेबल, खुच्र्या, साऊंड सिस्टीम, स्टेजसाठी वापरलेल्या लाकडी फळय़ा, कपडे व क्रेन, क्रेनचे टायर्स, क्रेन इंजिनमधील ऑईल इत्यादींना कार्यक्रमासाठी आणलेल्या फायरो टेक्निकमुळे आग लागून मोठी हानी झाली आहे.

परवानगी नसतानाही वापरले एलपीजीवरील फायरो टेक्निक?

मुंबईत मोठे कार्यक्रम आयोजित करताना एलपीजीवरील फायरो टेक्निक वापरण्यास मुंबई अग्निशमन दल परवानगी देत जात नाही. त्यातच हा कार्यक्रम गिरगाव चौपाटीवर असल्यामुळे हवेचे प्रमाण लक्षात घेता याठिकाणी एलपीजीवरील फायरो टेक्निक वापरण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे ही परवानगी अग्निशमन दलाने कशी दिली आणि दिली नसेल तर या टेक्निकचा वापर अनधिकृतरीत्या झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत परवानगी देणा-या मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी सध्या मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सरकारच्या कार्यक्रमासाठी सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून हा कार्यक्रम केला गेला असल्याचे बोलले जात आहे. नियम तोडून सरकारने काय आदर्श ठेवला आहे, असा सवाल विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *