मद्यधुंद तरुणाने नशेत गाडया पेटवून दिल्याची घटना शनिवारी मध्यरात्री ठाण्यात घडली आहे. श्याम जाधव (२९) असे या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर श्याम याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
श्याम याने शनिवारी रात्री दारूच्या नशेत ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील गुरुकुल सोसायटीसमोर उभी असलेली एक चारचाकी गाडी, चार रिक्षा, दोन बाईक आणि एक ट्रक पेटवून दिला.
या घटनेत या सर्व गाडया जळून खाक झाल्या आहेत. या प्रकारानंतर नौपाडा पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत श्याम याला अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका मद्यपीने स्टेशन भागात काही दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यामुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.