मुंबई व परिसरातील गोरगरिबांच्या झोपडय़ांवर मे महिना व पावसाळय़ाच्या दिवसांत स्थानिक प्रशासन अथवा सरकारने कारवाई करू नये, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी शुक्रवारी आझाद मैदानात उपोषण केले. गरिबांचे प्रश्न समजून घेताना देशातील एकही झोपडपट्टीवर मे ते सप्टेंबर दरम्यान कारवाई केली जाणार नाही, असे आदेश केंद्र सरकारने देण्याची मागणीही जशोदाबेन यांनी यावेळी केली.
झोपडपट्टय़ांच्या प्रश्नावर उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘गुड समारीतन मिशन’ संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘पावसाळय़ाच्या तोंडावर झोपडपट्टय़ांवर कारवाईत अनेक लोक बेघर होऊन त्यांचे हाल होतात. त्यांची मुलेबाळेही रस्त्यावर येतात.
रस्त्यावरील मुलांसाठी काम करणा-या ‘गुड समारीतन मिशन’मुळे याची माहिती आपणाला मिळाली. या संस्थेकडून विक्रोळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टीलाही त्यांनी भेट दिली. संस्थेचे लहान मुलांसाठी चालवलेले कार्य पाहिले. मी, जर याप्रश्नी उपोषणाला बसले तर प्रशासन त्याचा विचार करेल, असे संस्थेचे म्हणणे होते. त्यामुळे एक दिवसाचे उपोषण केल्याचे जशोदाबेन यांनी सांगितले.
आझाद मैदानात उपोषणासाठी बसलेल्या जशोदाबेन यांना पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात प्रश्न विचारले असता, त्यांनी या विषयावर आपल्याला काहीही विचारू नका, अशी विनंती केली.