शिवसेनेच्या बालेकिल्यात मनसेचा ‘व्हॅलेंटाइन डे’

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणारा विरोध मावळत चालला आहे. मनसेने चक्क शिवाजी पार्क येथील सेल्फीपॉइंटवर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी या सेल्फीपॉइंटला लाल रंगाच्या बदामच्या प्रतिकृती लावल्या जाणार आहेत.

व्हॅलेंटाईन डेला विरोध करणा-या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसे प्रेमाचे रंग भरत प्रेमीयुगुलांना सेल्फीकट्टा तयार करून देणार असल्यामुळे शिवाजी पार्ककरांमध्ये उत्सुकता पसरली आहे.

शिवाजी पार्क येथील मॉँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळय़ाच्या मागील बाजूला मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून सेल्फीपॉइंट बनवला आहे. सेल्फी पॉइंटला तरुणांसह शिवाजी पार्कमधील नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पॉइंटवर जास्तीत जास्त तरुण-तरुणींसह पर्यटकांनी हजेरी लावावी, यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातूनच व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने सेल्फीपॉइंटला लाल बदामाच्या प्रतिकृती लावल्या जात आहेत. शुक्रवार-शनिवापर्यंत हे काम पूर्ण होऊन प्रेमाचा सेल्फीपॉइंट तयार होणार आहे. गेल्या काही वर्षापासून व्हॅलेंटाईन डेला शिवसेनेचाही विरोध मावळत चालला आहे.

शतदा प्रेम करावे..

व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात मनसे केव्हाही नव्हती. व्हॅलेंटाईन डे साजरा करणा-यांना मुंबईत सेल्फी काढता यावे, असे हे ठिकाण आहे. त्यामुळे या सेल्फीपॉइंटला प्रेमाचे प्रतीक असलेल्या बदामाच्या प्रतिकृती लावल्या जाणार आहेत. तसेच ‘शतदा प्रेम करावे..’असा एक फलकही लावला जाणार आहे. त्यामुळे या प्रेमाच्या दिवसात मराठीपण जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे मनसेचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *