हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यासाठी मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे जून महिन्याचा मुहूर्त सांगण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात रेल्वेच्या इतर सर्वच कामांच्या मुहूर्ताप्रमाणे हादेखील हुकण्याची शक्यता आहे. वडाळा आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मोठी कामे अद्यापि झाली नसून डॉकयार्ड रोड, कॉटनग्रीन आणि रे रोड येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे कामही कूर्मगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१२ डब्यांच्या गाडीसाठी प्लॅटफॉर्म रुंदीकरणात रे रोड, कॉटनग्रीन आणि डॉकयार्ड रोड येथे अडथळे होते. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न एमआरव्हीसीचे अधिकारी आणि रेल्वे अधिकारी करत होते. मात्र डॉकयार्ड रोडला रे रोडच्या दिशेला असलेला रॅम्प तोडणे शक्य नाही. तसेच सँडहर्स्ट रोडच्या दिशेला प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी वाढवणे शक्य नाही. या समस्येवर तोडगा निघणे कठीण झाल्याने येथील काम बराच काळ खोळंबले होते.
रे रोड आणि कॉटनग्रीन येथे एमआरव्हीसीने बऱ्यापैकी काम केले आहे. कॉटनग्रीन येथे वडाळ्याच्या दिशेला तीन डब्यांसाठी प्लॅटफॉर्म वाढवण्यात आला आहे. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून एकवर जाण्यासाठी पादचारी पूल नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून खाली उतरणारा रॅम्प अरुंद होणार आहे. रे रोड येथेही मुंबईच्या दिशेला प्लॅटफॉर्म वाढवणे शक्य नसल्याने वडाळ्याच्या दिशेला प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. पण येथेही पादचारी पुलाची अडचण असून पुढील किमान दोन महिन्यांत हा पादचारी पूल उभा राहणे अशक्य आहे. परिणामी जून महिन्यापर्यंत या मार्गावर १२ डब्यांची गाडी चालू करण्याचा एमआरव्हीसीचा इरादा सफल होण्याची शक्यता धूसर आहे.
‘बारा डबा’ गाडी फलाटाशिवाय धावणार कशी?
