मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ बेळणे येथे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच मृत्यूमुखी पडले तर २८ जण जखमी झाले आहेत.
हा अपघात मासे विक्रीसाठी घेऊन जाणारा कंटेनर आणि लक्झरी बस यांच्यात झाला. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी ओरोस आणि गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खासगी बस गोव्याकडून लोणावळ्याच्या दिशेने जात होती, तर मासे वाहतूक करणारा कंटेनर रत्नागिरीकडून कर्नाटकच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांच्या समोरील दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.