बलात्कार पीडित महिलेवर अश्लिल शेरेबाजी करणा-या बोरिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांना निलंबित केले आहे. पीडित महिलेने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्या व्यक्तीने लग्नास नकार दिल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
या बलात्कार प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अनिल आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानुसार पीडितेची तक्रार नोंदवून घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी अश्लिल शेरेबाजी केली.
यामुळे पीडित महिलेने याची तक्रार आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली. आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश दिले होते.
प्रथमदर्शनी चौकशीत दोषी आढळलेल्या अनिल आव्हाड यांना निलंबित केल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फतेसिंग पाटील यांनी सांगितले.