हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून सूरू असेलला वाद अधिकच चिघळत चालला असून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक राजीनामे देणार असल्याचे पत्रकाद्वारे सांगितले आहे.
स्मृती इराणी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली असून यामध्ये ‘संबंधित विद्यार्थी ओबीसी होता, असे असताना जाणीवपूर्वक यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. इराणी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
हैदराबाद विद्यापीठातील अनुसुचित जाती व जमाती शिक्षक व अधिकारी संघटनेने एक पत्रक प्रसिद्ध केले. ‘स्मृती इराणी स्वतःला आणि बंडारु दत्तात्रेय यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाला दुसरे वळण देत आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण राजीनामा देणार आहोत, असे या पत्रकात म्हटले आहे.
या प्रकरणानंतर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी रोहितच्या आई वडिलांची भेट घेतली तर विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या. गुरूवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हैदराबाद विद्यापीठात जाणार आहेत.